येरवडा, ता. १७ : दुचाकीचालकाला वाचविताना कारचालकाचे गाडीवर नियंत्रण सुटून फुटपाथवरील झाडाला धडकून झालेल्या अपघातात युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तिचे मित्र- मैत्रीण अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी पहाटे पुण्यातील संगमवाडी रस्त्यावर घडली आहे.
ऋतुजा भालेराव (वय – २२, रा. सध्या विमान नगर, मुळ औरंगाबाद) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. तर चालक प्रतीक गोळे (वय २७, रा. नरे आंबेगाव मूळचा सातारा) व ऋतिका शर्मा (वय २४, रा. विमान नगर) हे दोघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक, ऋतिका आणि ऋतुजा हे एकाच कंपनीत कामाला आहेत. गुरूवारी हे तिघे प्रतिकच्या कारने संगमवाडी रस्त्याने पुण्याकडे जात असताना अचानक एक दुचाकीमध्ये आली. दुचाकीला वाचवत असताना कार डाव्या बाजूला असणाऱ्या फुटपाथवरील एका झाडाला धडकली. धडकेमुळे झाड तुटून कार त्यामध्ये अडकली होती. कारच्या मागील सीटवर ऋतुजा बसली होती. तिघेही जण या अपघातात जखमी झाले होते.
दरम्यान, ऋतुजा हिच्या डोक्याला जबर मार लागला होता. घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल व नागरिकांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान ऋतुजा हिचा मृत्यू झाला. तपास येरवडा पोलीस करीत आहेत.