Pune News : पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अनेक कारणांमुळे सातत्याने चर्चेत असते. आता विद्यापीठातील मेसच्या जेवणामध्ये किडे आढळल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपासून विद्यापीठातील जेवणात अळी, कीडे सापडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलींच्या मेसमध्ये देखील किडे आढळले होते. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाल्यास त्याला मेस चालक व विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्यात आला आहे. लवकरच विद्यार्थी परिषद व्यापक आंदोलन उभे करणार असल्याचे सांगण्यात आले.
मेस चालकांची मनमानी
या प्रकाराविषयी विद्यार्थी परिषदेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. परिषदेचे पुणे विद्यापीठ अध्यक्ष शिवा बारोळे म्हणाले की, विद्यार्थांच्या आरोग्याशी होणारा खेळ विद्यार्थी परिषद चालू देणार नाही. जेवणाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. विद्यापीठाने यावर लवकरच भोजन समिती नेमावी. जेणेकरून मेसवर नियंत्रण राहील. मेस चालकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही.
दरम्यान, पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहामध्ये मुलींच्या जेवणासाठी स्वतंत्र मेस आहे. या मेसमध्ये सकाळी ६० ते ७० विद्यार्थीनी जेवणासाठी येतात तर संध्याकाळी १२५ ते १५० विद्यार्थीनी जेवणासाठी येत असतात. सकाळच्या नाष्ता याच मेसमध्ये दिला जातो. काही दिवसांपूर्वी मुलींच्या मेसमध्ये दिलेल्या पोह्यांमध्ये एक झुरळ आढळले होते. ही बाब अतिशय गंभीर असून, सातत्याने विद्यापीठांमधील मेस चालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.