Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मित्र सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. एका मित्राने गप्पांच्या ओघात चेष्टा-मस्करी केली. याचा राग अनावर झाल्याने इतर तिघांनी आपल्याच मित्राच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तसेच बांबुने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात नुकताच उघडकीला आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत सोमनाथ शिंदे (वय २५, रा. भिमाले कॉम्प्लेक्स, संदेशनगर, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश वाघमारे (वय १८), योगिराज वाघमारे (वय ४०), धनराज वाघमारे (वय ५०, सर्व रा. भिमाले कॉम्पलेक्स, मार्केटयार्ड) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भिमाले कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडला.
फिर्यादी आणि आरोपी गणेश वाघमारे हे मित्र असून, सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. यावेळी त्यांच्यामध्ये मस्करी चालू होती. त्याचा गणेश याला राग आला. त्याने इतरांना बोलावून घेतले. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन इतरांनी आणलेल्या हत्याराने व बांबुने फिर्यादीच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. योगीराज वाघमारे याने बांबुने तर धनराज वाघमारे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सध्या फिर्यादी हनुमंत शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.