Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे गेल्या दोन महिन्यांत घडणाऱ्या घटना-घडामोडींमधून निदर्शनास येत आहे. गुन्हेगारी वाढल्यामुळे पोलीस आक्रमक झाले आहेत. कोयता गँगचा धुमाकूळ रोखण्यासाठी गुन्हेगारांवर मोकोका लावला जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी दीड हजारपेक्षा जास्त गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन राबवले जात आहे. हे सर्व सुरू असतानाच पुन्हा एकदा चोरीची घटना उघडकीस आली आहे. कात्रज परिसरात वास्तव्यास असलेल्या आयकर सल्लागाराच्या घरातच चोरी झाली असून, बंद फ्लॅटमधून लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे.
कात्रज परिसरातील घटना
पुण्यातील कात्रज भागात ही घटना घडली आहे. या घटनेत लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आयकर सल्लागाराच्या घरात ही चोरी झाली. (Pune News) कात्रज येथील गुजर-निंबाळकरवाडी भागात आयकर सल्लागार राहतात. ते कुटुंबियांसह बालाजीनगर येथील दुसऱ्या घरात गेले होते. त्यामुळे त्यांचा कात्रजमधील फ्लॅट बंद होता. त्या बंद फ्लॅटमधून ११.२८ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले. दरम्यान, संबंधित आयकर सल्लागार सोमवारी घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेबाबत बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ म्हणाले की, आयकर सल्लागाराच्या कात्रज येथील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. (Pune News) त्यानंतर त्यांनी कपाटाचे कुलूप तोडून दागिने चोरून पळ काढला. आता या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत आहेत. दरम्यान, चोरीची घटना ज्याठिकाणी घडली, त्याठिकाणी असलेल्या सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तसेच सुरक्षा रक्षकही तैनात नव्हते. यामुळे चोरट्यांना शोधणे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : याला म्हणतात यश! वडिलांनी हमाली करून शिकवलं; मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला सीए!