Pune News : पुणे : शहर आणि उपनगरांतील नाले बुजवून त्यावर मोठ्या प्रमाणावर बांधकामे करण्याचे प्रकार नवे नाहीत. पण आता मात्र एक अजब तक्रार महापालिकेकडे आली आहे. हिंगणे येथील तळजाई पाचगाव-पर्वती वन विभागामध्ये ४० फुटी नैसर्गिक नाला असल्याची नोंद होती. मात्र, हा नैसर्गिक नालाच गायब झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. सध्या हा नाला केवळ कागदावरच दिसत असल्याने नाला चोरीला गेल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. Pune News
नाला केवळ कागदावरच
शहरात अनेकदा पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवून बांधकाम केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने प्रायमूव्ह या संस्थेकडून सर्वेक्षण करून घेतले होते. त्यामध्ये नाले बुजवून बांधकामे केल्याची वस्तुस्थिती पुढे आली होती. काही वर्षांपूर्वी आंबिल ओढ्याला पूर आल्यानंतर नाल्यांवरील अतिक्रमणे आणि बांधकामे, नाला बुजवण्याचे प्रकार अधोरेखित झाले. महापालिका केवळ सर्वेक्षण करत असून, कारवाईस टाळाटाळ करत असल्याचे सत्य समोर आले. हे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत. बावधन, लोहगाव, वाघोली, उंड्री, पिसोळीसारख्या भागांमधील नाले बुजविण्यात आल्याने त्याचा फटका यापूर्वीच शहराला बसला आहे. Pune News
दरम्यान, हिंगणे खुर्द येथील सर्व्हे क्रमांक पाचमधून हा नाला वाहत हिंगण्यातून मुठा नदीला मिळत होता. मात्र, या नाल्याचे अस्तित्व दिसत नसल्यामुळे तो चोरीला गेल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी केली आहे. महापालिका प्रशासन आणि विकसक यांच्या आशीर्वादानेच तो गायब झाला आहे, असा आरोप करत या प्रकाराला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर आणि विकसकावर कारवाई करण्याची मागणी घरत यांनी आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. Pune News
डोंगर माथा किंवा डोंगर उतारावर विना परवाना काम होत असल्यास त्याचा परिणाम जैवविविधतेवर होतो. हाच प्रकार हिंगण्यातील जैवविविधता उद्यानासाठी (बीडीपी) आरक्षित जागेतील नाल्याबाबत झाला आहे. त्यामुळे आपत्ती ओढवण्याची शक्यता असून विकसक, जागा मालक आणि या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी घरत यांनी केली आहे. Pune News