Pune News : पुणे : ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो वापरून फसवणूक करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. नुकताच पुण्यातील कोंढवा परिसरात असाच प्रकार उघडकीस आला आहे. ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो वापरून ग्राहकांना कपड्यांची विक्री करणाऱ्या दुकानदाराला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
यावेळी पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीच्या पुमा कंपनीच्या एकूण ३०० ट्रॅक पॅन्ट व १ लाख ८० हजार रुपये किमतीचे पुमा कंपनीचे २२५ टी-शर्ट जप्त केले आहेत. तसेच दुकान मालक विशाल पिसाळ याच्यावर कॉपराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोंढवा येथील दुकानदार पुमा कंपनीचा बनावट लोगो वापरुन ग्राहकांना कपड्यांची विक्री करत होता. कोंढवा खुर्द येथील जिजामाता कॉम्पलेक्समधील रायबा फॉर मेन्स या दुकानावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र सोहन सिंग यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात दुकानदार विशाल दिलीपराव पिसाळ याच्यावर कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच कारवाई करत कपडे जप्त केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आर.एन.ए.आय.पी एटोर्नी कंपनीचे फिल्ड ऑफिसर आहेत. याच कंपनीला पुमा या ब्रॅण्डेड कंपनीचा अधिकृत लोगो आणि नावाचा गैरवापर करुन कपड्यांची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली होती. याची शाहनिशा करुन खात्री पटवल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कपडे जप्त केले आहेत.