Pune News | पुणे : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून त्याने ठेवी गोळा करत तब्बल साडेचारशे गुंतवणुकदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी आल्यानंतर रेहान एंटरप्रायजेस कंपनीचे संस्थापक महादेव जाधव व इतर संचालकांवर एमपीआयडी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईस्थित रेहान एंटरप्रायझेसने आम्ही क्रिस्टो करन्सी, शेअर मार्केट, फॉरेक्समध्ये गुंतवणुक करतो. दुबई, सिंगापूर येथे कार्यालये आहेत, असे सांगून लोकांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडले. ज्यावेळी पैसे परत करण्याची वेळ आली, तेव्हा ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) सर्व बँक खाती गोठवल्याचे त्यांनी सांगितले.
फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी १७ लाख रुपये गुंतवले. त्यातील ९ लाख ४४ हजार रुपये त्यांना परत मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. ३० ऑगस्ट २०२२ रोजी महादेव जाधव याने झुम मिटिंग घेतली. त्याला ४५९ गुंतवणुकदार उपस्थित होते. या मिटिंगमध्ये त्याने रेहान एंटरप्रायझेसची सर्व बँक खाती ईडीने गोठवली आहेत. त्यामुळे पुढील ३ महिने कोणालाही मुद्दल व व्याज मिळणार नाही. खाती सुरु झाल्यावर सर्वाची रक्कम परत करतो. कोणी पोलीस तक्रार केली तर मला आत जावे लागेल. त्यामुळे कोणालाही पैसे मिळणार नाही, असे सांगितले.
त्यानंतर दर महिन्याला तो नवे नवे वादे करत राहिला. नवीन करारनामे सर्वांना पाठविले. मार्च २०२३ पर्यंत सर्वांची रक्कम देणार, असे सांगून तो झुलवत राहिला. त्यानंतर महादेव जाधव याचा नंबर बंद लागतो. तसेच त्याचे पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, लातूर येथील सर्व ऑफिसेस बंद झाली आहेत.
त्यानंतर आता गुंतवणुकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. महादेव जाधव व इतरांनी तब्बल ४५९ हून अधिक गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. त्यापैकी काही जणांची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे आली आहे.