Pune News : पुणे : घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये हुंडा न दिल्याने, विवाहितेचा छळ करून, तिचे शीर धडावेगळे करून, तिचा निघृण खून करणाऱ्या पती आणि सासऱ्याला जेन्मेठेपेची शिक्षा तर सासूला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी (ता. ७) ठोठावली आहे. हे आदेश जिल्हा न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी दिले. हा प्रकार १३ एप्रिल २०१३ रोजी घडला आहे.
गुन्हा दाखल
दीपाली कांताराम ढंगे (वय २४) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती कांताराम सत्यवान ढगे (वय २७), सासरे सत्यवान बबन ढगे (वय ५७) व सासू बायसाबाई सत्यवान ढगे (वय ४०, सर्व रा. आपटी, ता. शिरुर, जि. पुणे) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या गुन्ह्यातून ज्ञानेश्वर विठ्ठल वाघमोडे (वय ४८, रा. आपटी, ता. शिरुर, जि. पुणे) यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या प्रकरणी यमुनाबाई दत्तात्रय मैद (वय ६०, रा. करंजावणे, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यमुनाबाई मैद यांची मुलगी दीपाली यांचा विवाह कांताराम ढगे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर आरोपीने दीपालीला घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये घेउन ये, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना घर बांधून द्यायला सांग, असे सांगितले. मात्र, दीपालीच्या आई-वडिलांनी या मागणीला विरोध दर्शविला. त्यानंतर आरोपीने आपल्या आई-वडिलांसोबत संगनमत करून, दीपालीचा खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे शीर कापून धडावेगळे केले. एवढ्यावरच न थांबता, शीर अज्ञातस्थळी फेकून दिले.
याप्रकरणी यमुनाबाई मैद यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपींना अटक केली. गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. लीना पाठक यांनी कामकाज पहिले. ॲड. लीना पाठक यांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून, न्यायालयाने आरोपी कांताराम ढगे व सत्यवान ढगे या बापलेकाला जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी आणि बायसाबाई ढगे यांना 3 वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.या गुन्ह्यातून ज्ञानेश्वर वाघमोडे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हे आदेश न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी दिले आहेत. दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील ॲड. लीना पाठक यांना शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, पोलीस हवालदार एस. बी. भागवत, पोलीस अमंलदार रज्जाक शेख पोसई व प्रफुल्ल सुतार यांची मदत मिळाली.