Pune News : पुणे : महापालिकेच्या गाडीवर दररोजचे काम नेमून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या वाहन वाटप कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वारगेट (पुणे) येथून मंगळवारी (ता. २२) रंगेहाथ पकडले.
लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले…
पांडुरंग साधू लोणकर (वय ५७, पद- स्टार्टर (वाहन वाटप) वर्ग- ३ नेमणूक, पुणे महापालिका, व्हेईकल डेपो, गुलटेकडी, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुणे महापालिकेच्या गुलटेकडी येथील वाहन डेपोत खासगी कंत्राटी वाहनचालक आहेत. आरोपी पांडुरंग लोणकर यांनी तक्रारदार यांच्याकडे महापालिकेच्या गाडीवर दररोज काम नेमून देण्यासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. Pune News
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तेव्हा तक्रारदारांकडून चार हजार रुपयांची लाच स्विकारताना आरोपी पांडुरंग लोणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात आरोपी पांडुरंग लोणकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत. Pune News