पुणे : राज्यातील कारागृहांत विविध कामे करणाऱ्या कैद्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात (पगार) वाढ करण्यात आली आहे. कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी पगारवाढीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अकुशल, अर्धकुशल आणि कुशल कैद्यांच्या पगारात अनुक्रमे पाच, सहा आणि सात रुपयांची वाढ झाली आहे.
कारागृहात विविध गुन्ह्यांखाली शिक्षा झालेल्या ठरावीक कैद्यांना सुधारणा आणि पुनर्वसन योजनेंतर्गत विविध उद्योगांत आणि शेतीची कामे दिली जातात. नव्याने काम शिकणारा हा अकुशल, काही प्रमाणात कामे करणारा अर्धकुशल आणि माहितगार कैदी कुशल अशी वर्गवारी केली जाते. त्यानुसार कैद्यांना दैनंदिन कामाचा मोबदला दिला जातो. यापूर्वी अकुशल कैद्याला दैनंदिन कामाचे ४८ रुपये, अर्धकुशलसाठी ६१ रुपये आणि कुशल कैद्याला ६७ रुपये मोबदला मिळत होता.
सरकारच्या निर्णयानुसार दर तीन वर्षांनी कैद्यांच्या मोबदल्यात (पगार) दहा टक्के वाढ करण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी कारागृहातील कैद्यांच्या पगारात वाढ करण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे कैद्यांच्या पगारात दैनंदिन पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. याचा सात हजार कैद्यांना लाभ होणार आहे.
कारागृहात काम करून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून कैदी स्वतःसाठी उपहारगृहातून दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करतात; तसेच स्वतःच्या कुटुंबीयांना अडचणीच्या वेळी पोस्टाच्या माध्यमातून पैसे पाठवतात. काही बंदी मिळालेल्या आर्थिक मोबदल्यातून वकिलांची फी भरतात.
दरम्यान, विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची ठरावीक कालावधीनंतर महागाई लक्षात घेऊन पगारवाढ केली जाते. त्याच धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कैद्यांना पगारवाढ देण्यात यावी, अशी विनंती कैदी प्रशासनाकडे करीत होते.