येरवडा, (पुणे) : टँकर व्यावसायिकाकडे ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील एका बड्या दैनिकाच्या पत्रकारासह दोघांच्यावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उदय पोवार (वय – ४०, धंदा पत्रकार, रा. सर्वे नंबर ८२, गल्ली नंबर एक कर्मभूमी नगर लोहगाव, पुणे) व शब्बीर शेख धंदा पत्रकार रा. सर्वे नंबर ११२ आळंदी धानोरी रोड बुद्ध विहार जवळ, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विलास गुलाबराव देशमुख (वय – ६४, रा. सर्वे नंबर १७ /२ ए हरी नगर विषम शाळेसमोर वडगाव शेरी पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा टँकरमधून पाणी भरून विकण्याचा व्यवसाय आहे. आरोपी उदय पोवार व शब्बीर शेख यांनी १० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तसेच ५ मार्च व २५ मार्च २०२३ रोजी वडगाव शेरी पुणे येथील पंपिंग स्टेशन येथे फिर्यादी विलास देशमुख यांना खंडणीची मागणी केली.
यावेळी देशमुख यांच्याकडून आरोपींनी तीस हजार रुपये घेतले. यामध्ये २५ हजार रुपये कॅश व पाच हजार रुपये यूपीआय द्वारे घेतले. यावेळी ते आणखी पैश्याची मागणी करीत असल्याने देशमुख यांनी नकार दिला. यावेळी विस्टा सोसायटी लोहगाव पुणे येथे शब्बीर शेख याने देशमुख यांचा चालक संजय राजाराम मुधोळकर याचे फोनवरून फोन करून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली.
१३ जुलै २०२३ ला एका ऑनलाईन चॅनेलवर खोटी बातमी दाखविली तसेच १४ जुलैला एका नामंकित वर्तमानपत्रात टँकर केंद्रावरून पाण्याला फुटतात पाय या सदराखाली देशमुख यांच्याविषयी खोटी बातमी प्रकाशित करून बदनामी केली.
दरम्यान, याप्रकरणी देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनउदय पोवार व शब्बीर शेख या दोघांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड करीत आहेत.