Pune News : पुणे : वैद्यकीय शाखेत प्रवेश देण्यासाठी दहा लाख रुपये लाच घेताना अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बंगिनवार ( वय ५४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ८) सायंकाळी अटक केली. अटक झाल्यानंतर तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Pune News)
सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, याप्रकरणी मंगळवार पेठेतील पारगे चौकात असलेल्या महाविद्यालयाच्या आवारात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर मनसेचे आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय गवळी यांच्यासह सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ तांत्रिक भाऊसाहेब माने यांनी याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डॉ. आशिष श्रीनाथ बंगिनवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी अटक केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बुधवारी (ता. ९) दुपारी वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात जमले. डॉ. बंगिनवार यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन त्यांनी कक्षाची तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयातील तीन संगणक, खुर्च्यांची तोडफोड केली. त्यानंतर तोडफोडीची तक्रार दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune News)
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.