Pune News पुणे : पुण्यातील स्वारगेट चौकात मागील आठवड्यात एका तंबाखू व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट-2 ने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह 31 जिवंत काडतुसे आणि 3 लाख 52 हजार 500 रूपये असा एकुण 4 लाख 19 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याबाबतची माहिती पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. (Pune News)
तंबाखू व्यावसायिक लतेश सुरतवाला (वय 51) यांच्यावर गेल्या आठवड्यात गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत नितीश कुमार रमाकांत सिंग (22, सध्या रा. मार्केटयार्ड, पुणे. मूळ रा. रामदिरी गाव, बुगुसरा, मटिहाणी ठाणा, बिहार), अभयकुमार सुबोदकुमार सिंग (23, सध्या रा. मार्केटयार्ड, पुणे. मूळ रा. रामदिरी गाव, बुगुसरा, मटिहाणी ठाणा, बिहार) आणि मोहमद बिलाल शेख (28, रा. आंबेडकरनगर, गौसिया मस्जिदजवळ, मार्केटयार्ड, पुणे) यांना अटक केली.
गुन्हे शाखेकडून तपास
स्वारगेट चौकात व्यावसायिकावर गोळीबार झाल्यानंतर या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत होते. युनिट-2 च्या पोलिसांना या गोळीबारातील मुख्य आरोपी हे कर्नाटकातील बंगलोर येथे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या या माहितीच्या आधारे, पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार उत्तम तारू, अमोल सरडे, उज्वल मोकाशी आणि गजानन सोनुने यांचे पथक बंगलोरला रवाना झाले. त्यांनी कारवाई करत या तिघांना अटक केली.