Pune News : पुणे, ता.११ : अल्पवयीन मुलगी खासगी क्लासवरून घरी चालत जात असताना पोलीस कर्मचाऱ्याने तिला अडवून विनयभंग केल्याची घटना जुन्नर तालुक्याच्या हद्दीतील येडगाव रस्ता परिसरात घडली होती. ही घटना ताजी असतानाच, आता पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक या पदावर कार्यरत असणाऱ्या एकाने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खाकी वर्दीला काळा डाग लागला असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘रक्षकच भक्षक’ झाल्याने न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
गुन्हा दाखल
याप्रकरणी लोहगाव येथील १७ वर्षाच्या मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलीस नाईक केशव इरतकर याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा बी.एम.सी.सी रोडवरील एका इन्स्टिट्युटच्या आवारात शनिवारी (ता.७) सकाळी साडे दहा ते साडे बाराच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव इरतकर हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. आरोपीने पीडित मुलीशी ओळख वाढविली. मोबाईलमध्ये पीडित मुलीसोबत सेल्फी काढले. तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर आरोपीने शनिवारी सकाळी मुलीला घरी भेटायला बोलावून घेतले. त्यानंतर तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान, याप्रकरणी पीडित मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी केशव इरतकर याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.