पुणे : पुणे इसिस दहशतवादी प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी याकूब साकी आणि इम्रान या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. अटक केलेल्या या दोघांनीही साताऱ्यातील एक सोन्याचे दुकान लुटल्याची माहिती समोर आली आहे. टेरर फंडिंगसाठी या दहशतवाद्यांनी थेट सोनाराच्या दुकानात लूटमार केली होती.
साताऱ्यातील सोनाराच्या दुकानातून त्यांनी लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड चोरी केली होती. दहशतवाद्यांनी ही रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरली, अशी धक्कादायक माहिती एटीएसने केलेल्या तपासातून समोर आली आहे. मोहम्मद इमरान, मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी या दहशतवाद्यांना 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, नोव्हेंबर २०२३ मध्ये एनआयएने इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी एनआयएकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी आखला होता. त्यासाठी थेट सिरियामधून या दहशतवाद्यांना सूचना मिळत होत्या, असा दावा एनआयएने आपल्या आरोपत्रात केला होता.
याआधी तपासात अशी माहिती समोर आली होती की, अतिरेक्यांनी बॉम्बची निर्मिती करण्यासाठी काही कोडवर्ड तयार केले होते. या प्रकरणात आरोपींवर एनआयएने यूएपीए, विस्फोटक पदार्थ अधिनियम आणि इतर कलमांनुसार चार्जशीट दाखल केले आहे. अतिरेक्यांनी जंगलात आपले प्रशिक्षण केंद्र उघडले होते. या प्रशिक्षण केंद्रात जवळील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचणीची योजना आखत आयईडी स्फोटक बनवत होते.