(Pune ) पुणे : शहरातील मंहम्मदवाडी परिसरात गस्तीवर असलेल्या बीट मार्शलला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना कोंढवा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री गस्त घालत असताना कारमध्ये संशयास्पदरित्या थांबलेल्या तिघांकडे चौकशी केली असता त्यांना तू कोण आहेस आम्हाला विचारणारा तुला माहित आहे का ?आम्ही कोण आहोत असे म्हणत शिवागाळ करत धक्काबुक्की केली होती.
कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार…!
याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहित पाटील यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून मितेश संजय परदेशी(वय ३२, रा. जगतापनगर, वानवडी), मनिष जयप्रकाश मेहता (वय ३६, रा. मेहदसे हॉस्पिटल, दापोली, जि. रत्नागिरी), सुमित राजेश परदेशी(वय ३६, रा. शांतीनगर, वानवडी) यांना अटक केली आहे. ही घटना मंहम्मदवाडी येथील रहेजा प्रिमियम सोसायटीसमोर रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
कारमध्ये तीन जण मंहम्मदवाडी येथील रहेजा प्रिमियम सोसायटीसमोर थांबलेले दिसून आले दरम्यान गस्तीवर असणारे बीट मार्शल यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली.तेव्हा मनिष मेहता याने फिर्यादी यांना तू कोण आहेस आम्हाला विचारणारा. तुला माहित आहे का ? आम्ही कोण आहोत, असे बोलून फिर्यादी यांची कॉलर पकडुन त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या शर्टाचे बटण तोडून फिर्यादी यांचे गालावर चापट मारुन इतरांनी आरेरावीची भाषा करुन शिवीगाळ करुन तुला इथेच संपवतो, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.