पुणे : प्रसिद्ध हॉटेल केएफसीची फ्रँचाईजी देण्याच्या नावाखाली महिलेला सायबर चोरट्यांनी ८० लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी महिलेनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या इस्टेट एजंट आहेत. तक्रारदार या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी कंपनी शोधत होती. त्यानंतर महिलेची आणि गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू असे नाव सांगून ओळख झाली होती. आणि आरोपींनी केएफसी हॉटेलची फ्रँचाईजी देतो, असे तक्रारदार महिलेला सांगितले.
त्यानंतर आरोपींनी कंपनीचे खोटी कागदपत्रे तयार केली. आणि त्या महिलेला पाठविली. इतकेच नव्हे तर केएफसीची खोटी वेबसाईट देखील आरोपींनी बनवली होती. आणि महिलेचा विश्वास संपादन केला.
दरम्यान, विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी महिलेला पैसे पाठविण्यास सांगितले. तक्रारदार महिलेने सायबर चोरट्यांच्या ४ वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये तब्बल ७९ लाख ७६ हजार रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून पाठविले. तरीही आपल्याला केएफसीची फ्रॅंचाईजी न मिळाल्याने आपली फसवणूक झाली आहे, हे महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरुन पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांपासून सावधान…
केएफसी हॉटेल हा खवय्यांचा लोकप्रिय ब्रँड आहे. त्यामुळे मोठमोठ्या शहरांमध्ये या केएफसीची फ्रॅंचाईजी घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. मात्र, या केएफसीची फ्रॅंचाईजी घेताना एका महिलेची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर चोरटे हे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून फसवणूक करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सायबर चोरट्यांपासून सावध राहा. असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.