पुणे : पुण्यातील एका सनदी लेखापाल (सीए) तरुणीने सांगलीतील कोल्हापूर रस्ता परिसरातील लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. २७) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
अस्मिता मिलिंद पाटील (३३, सध्या रा. पुणे, मूळ रा. शारदा हौसिंग सोसायटी, कुपवाड रस्ता, सांगली) असे सनदी लेखापाल (सीए) तरुणीचे नाव आहे. याबाबत तरुणीचा मित्र गजानन कुरळपकर याने सांगली शहर पोलिसांना माहिती दिली. तो रात्रभर लॉजवर त्या रुममध्ये होता. ही आत्महत्या की घातपात याबाबत पोलिस तपास करत असून संबंधित तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तक्रार नसल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता पाटील ही तरुणी पुण्यात सनदी लेखापाल म्हणून काम करत होती. शुक्रवारी (ता. २६) ती सांगलीत येणार असल्याने कोल्हापूर रस्त्यावरील साई डिलक्स लॉजवर रूम बुक केली होती. त्यावेळी तिचा मित्र गजानन कुरळपकर त्याठिकाणी आला होता. तोही लॉजवर होता. पहाटे साडेचारच्या सुमारास गजानन बाथरूममध्ये गेला. त्यावेळी तरुणीने फॅनला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. बाथरूममधून बाहेर येताच तरुणास धक्का बसला, त्याने तत्काळ लॉजमध्ये आरडाओरडा केला. शहर पोलिसांनाही याबाबत माहिती दिली.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणीचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला. गळफास घेऊन ही आत्महत्या केल्याचे उत्तरीय तपासणीत समोर आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी तिचा मित्र गजानन कुरळपकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो निवृत्त पोलिसाचा मुलगा आहे. त्याचे नातेवाईक शहर पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने आले होते.