(Pune Crime) पुणे : टपाल खात्याच्या कुरिअर सेवेपोटी ग्राहकांनी जमा केलेल्या साडेतीन लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी येरवडा पोलिसांनी येरवडा टपाल कार्यालयातील डाक सहायकच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भगवान श्रीरंग नाईक (वय ३७) असे गु्न्हा दाखल केलेल्या डाक सहायकाचे नाव आहे. याबाबत टपाल खात्यातील अधिकारी योगेश नानासाहेब वीर (वय ४२) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
नाईक येरवड्यातील टपाल कार्यालयात डाक सहायक आहेत. टपाल खात्याच्या कुरिअर सेवेसाठी ग्राहकांनी जमा केलेली तीन लाख ५९ हजार २९४ रुपये नाईक यांनी जमा केले नाही. या रक्कमेचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध शासन आणि ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करत आहेत.
दरम्यान, टपाल खात्यातील योजनांमध्ये ठेवीदारांकडून जमा करण्यात आलेल्या रक्कमेवरील २४ लाख रुपये कमिशनचा अपहार टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विमानतळ आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहार प्रकरणात सहा जणांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.