(Pune Crime) पुणे : एका नामवंत हॉस्पीटल असलेल्या वानवडी येथील रूबी हॉल क्लिनिकमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कॅज्युल्टी वॉर्डमध्ये काम करीत असलेल्या वॉर्डबॉयने चक्क अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याची माहिती समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आकाश चंदु परदेशी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आकाशचा भाऊ दिपक चंदू परदेशी (रा. वैदूवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मारूती किसन भालेराव (३६, रा. वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
आकाश परदेशी हे वानवडी परिसरातील जगतापनगर भागातून 25 मार्च रोजी जात होते. त्यांना अचानक चक्कर आल्याने ते रस्त्यात खाली पडले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ वानवडीतील रूबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल केले. उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिपक परदेशी हे हॉस्पीटलमध्ये गेले.
दरम्यान, मयत आकाश यांच्या गळयात ७० हजार रूपये किंमतीची सोनसाखळी होती. मात्र, हॉस्पीटलमधून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला त्यावेळी सोनसाखळी गळयात नसल्याचे आढळून आले. अंत्यसंस्कार केल्यानंतर दिपक चंदू परदेशी यांनी हॉस्पीटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम मारूती भालेराव यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष गायकवाड करीत आहेत.