पुणे Pune Crime : शहर परिसरासह ग्रामीण भागातूनचोरीला गेलेल्या तब्बल १६२ दुचाकी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. (Pune Crime) लातूर, बीड, धराशिवसह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातून जप्त करण्यात आली असून १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी वाहनचोरांविरोधात आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते. (Pune Crime)
गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी..
सचिन प्रदीप कदम (वय -३२, रा. कळंब, धाराशिव), अजय रमेशराव शेंडे (वय ३२, रा. सहजपूर, ता. दौंड), परमेश्वर भैरवनाथ मिसाळ (वय -२८, रा. कळंब, जि. धाराशिव), युवराज सुदर्शन मुंढे (वय- २३, रा. सहजपूर, ता. दौंड) यांच्यासह एकूण १४ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ही वाहने जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना देण्यात आले होते. त्यानुसार गुन्हे शाखेतील युनिट सहा, पाच, चार, दोन, दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक दुचाकी चोरट्यांच्या मागावर होते.
गुन्हे शाखा युनिट सहाचे वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुरेश जायभाय, नितीन मुंडे, सचिन पवार यांना दुचाकी चोरट्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने लातूर, धारशिव, बीड भागात वेशांतर करून शोध मोहीम राबविली. आरोपी अजय शेंडे, शिवाजी गरुड यांना अटक केल्यानंतर त्यांनी साथीदारांच्या मदतीने पुणे परिसरातील दुचाकींची लातूर, धाराशिव, बीड परिसरात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरट्यांकडून मिळत गेलेल्या माहितीनुसार पथकाने तब्बल १०० दुचाकी जप्त केल्या. यातील आरोपी शेंडे चोरट्यांच्या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.
युनिट पाचच्या पथकाने केलेल्या कारवाईत वैभव नागनाथ बिनवडे (वय -२०, तिघे रा. हडपसर) याच्यासह तिघांना पकडले. त्यांच्याकडून पाच लाख ४० हजार रुपयांच्या 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बिनवडे सराईत चोरटा आहे. युनिट चारने समीर शेख (वय -२९, रा. येरवडा) याच्यासह चौघांना अटक करीत ५ लाख ५५ हजार रुपयांच्या ९ दुचाकी जप्त केल्या.
दरम्यान, दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक दोनने किशोर उत्तम शिंदे (वय ३०, रा. वेताळ वस्ती, मांजरी बुद्रुक), शाहिक कलिम शेख (वय १९, रा. दिगंबरनगर, वडगाव शेरी) यांच्यासह साथीदारांना अटक केली. चोरट्यांकडून २१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. युनिट दोनने परभणीतील चोरटा भगवान राजाराम मुंडे (वय ३२) याला अटक केली असून त्याच्याकडून १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.