पुणे : पुणे महापालिका भवन परिसरातून पीएमपी बस चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना सुरक्षारक्षकांनी पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सूरज शशिकांत जडिवे (वय-३५, रा. चिंतामणी पॅरेडाईज, भारतीनगर, कोथरुड), मोहित अविनाश चव्हाण (वय-२६, रा. जनवाडी, गोखलेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकारणी सुरक्षारक्षक जालिंदर खंडाळे (वय-२७, रा. पर्वती दर्शन) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळे हे महापालिका भवनात सुरक्षारक्षक आहेत. ते कर्तव्य बजावीत असताना, आरोपी सूरज जडिवे आणि मोहित चव्हाण हे महापालिका भवनात आले. सुरक्षारक्षक खंडाळे यांना माहित होऊ न देता, आरोपींनी श्रमिक भवनजवळ लावलेली बस चालू केली. आणि दोघे जण बस घेऊन पसार होण्याच्या तयारीत होते.
दरम्यान, खंडाळे आणि त्यांचे सहकारी भीमराव सोनवणे यांनी बस चोरुन नेण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना पाहिले. त्यानंतर खंडाळे आणि सोनवणे यांनी दोघांना पकडले. बस थांब्याच्या परिसरातील केबीनवर बस आदळल्याने केबीनचे नुकसान झाले.
याप्रकारणी सुरक्षारक्षक जालिंदर खंडाळे यांनी चोरट्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरी, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. शिंदे करीत आहेत.