पुणे : पुण्यामधील फॅशन स्ट्रीटमध्ये विविध नामांकित ब्रँडच्या नावाखाली बनावट कपड्यांची चोरून विक्री होत होती. विक्री करणाऱ्यांवर कॉपीराईटच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने करून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
निसार उद्दीन शमुद्दीन शेख (वय ३१ रा. कोंढवा खुर्द), रिजवान इर्शात कुरेशी (वय ३२ रा. भीमपुरा पुणे), नोमान नजीर शेख (वय २९ रा. कुंभारवाडा पुणे), सय्यद राफे मगबुल अख्तर (वय ३२ रा. भवानी पेठ पुणे), मुस्ताक हसान कुरेशी (वय 30 रा. घोरपडी गाव पुणे) यांच्या विरोधात कॉपीराईट कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत एर एन ए टेक्नॉलॉजीचे अधिकारी महेंद्र सोहन सिंग देवरा (वय ३६ रा. पोस्ट पेरवा ता बाली राजस्थान) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक १६ रोजी फिर्याद दिली आहे.
नामांकित ब्रँडच्या नावाने बनावट कपड्यांची विक्री केली जात होती. नामांकित कंपन्यांचे बनावट टी शर्ट, जॅकेट, ट्रॅक पॅन्ट इत्यादी कपड्यांचा यात समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटमध्ये विविध नामांकित ब्रँडच्या नावाखाली बनावट कपड्यांची चोरून विक्री होत होती, याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली त्यानुसार पथकाने फॅशन स्ट्रीट मधील विक्रेत्यांच्या गाड्यावर एकाच वेळी छापा टाकला.
पथकाने पाच विक्रेत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २२२ टी-शर्ट ,१०२ जॅकेट, १३४ ट्रॅक पॅन्ट असा दोन लाख ८० हजार रुपयांची नामांकित कंपन्यांचे बनावट कपडे जप्त केले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलिस अंमलदार गजानन सोनवणे, उज्वल मोकाशी, नागनाथ राख, मोहसीन शेख यांच्या पथकाने केली.