Pune Crime News : तळेगाव दाभाडे, (पुणे) : मोबाईलचे हप्ते का भरत नाहीस असे विचारल्याने तिघांनी एका व्यक्तीवर कोयत्याने सार्वजनिक ठिकाणी वार केल्याची घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे परिसरातील यशवंतनगर येथे हा प्रकार मंगळवारी (ता. २८) घडला आहे.
याप्रकरणी विशाल नंदकिशोर खंदारे (वय – २४) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर अंकुश मते (वय २१), स्वप्नील उर्फ मोन्या आनंद जाधव (वय), गणेश ऊर्फ सौरभ आनंद जाधव (वय – २२) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यातील मयूर मते आणि गणेश जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
आरोपी मयूर मते याने फिर्यादी खंदारे यांच्या नावावर हप्त्याने मोबाईल घेतला. मात्र मयूर याने मोबाईलचे हप्ते भरले नाहीत. तू हप्ते का भरले नाहीस असे फिर्यादी याने मयूर याला विचारले. या गोष्टीचा मयूर याला राग आला. तो राग मनात ठेवून मयूर याने आपल्या दोन साथीदारासह फिर्यादीला शिवीगाळ केली. मी हप्ते भरणार नाही, तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. तसेच लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केले.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी फिर्यादी जखमी होऊन खाली पडले असताना देखील आरोपीने कोयत्याच्या मागच्या बाजूने पुन्हा वार केले. त्यानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, याप्रकरणी खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने नागरिकांत काही वेळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.