पुणे : पुण्यात एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आली आहे. सख्ख्या बहिणीचा( १६) खून करून भावानेच (१८) तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात वेगळाच खुलासा समोर आला आहे. त्यामध्ये आजारी असणाऱ्या बहिणीचा भावानेच खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. हडपसरच्या वैदवाडी परिसरात हि घटना घडली आहे. सुरुवातीला या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र आता भावा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साफिया सुलेमान अन्सारी (वय १६, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, वैदवाडी हडपसर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ शारिख सुलेमान अन्सारी (वय १८) याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साफिया नेह्मीच आजारी असायची. तिच्यावर कुटुंबीयांकडून उपचारही केले जात होते. मात्र तिच्यात काही फरक पडत नव्हता. घरात असताना ती आक्रमक व्हायची. घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जायची. घटनेच्या दिवशी म्हणजेच १७ जून रोजी देखील असाच प्रकार घडला. मयत साफिया भाऊ शारीखच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावून गेली. दोघात झटापट झाली. त्यानंतर रागाच्या भरात शारीख याने गळा दाबला. यातच साफीयाचा मृत्यू झाला.
त्यानंतर आपल्या हातातून गुन्हा घडल्याचे शारीखच्या लक्षात आल्यानंतर तो घाबरला. आपले कृत्य लपवण्यासाठी त्याने घरातच साफियाला गळफास दिला आणि आत्महत्या केली असे भासवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना ही घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र त्याआधीच साफियाचा लटकलेला मृतदेह खाली काढण्यात आला होता. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद म्हणून दाखल करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने खून केल्याची कबूल दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मोडवे करीत आहेत.