(Pune Crime News) पुणे : पुण्यातील एका सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस ( Pune Crime News )आला असून, भोरमधील शेतजमीन स्वस्त दरात विकत घेऊन देण्याची बतावणीकरून त्यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले. पण, जमीन न देता फसवणूक केली तर त्यांनी पैसे परत मागितले असता सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्तांना धमकावून आर्थिक नुकसान करण्याची भिती दाखवत ६ लाख रुपयांची खंडणी उकळली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी ५९ वर्षीय सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश अंकुश पोटे, संदेश अंकुश पोटे (रा. सर्व रा. कुदळे पाटील रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१५ पासून सुरु होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
तक्रारदार नुकतेच पुणे पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. ते सहाय्यक आयुक्त म्हणून निवृत्त झाले असून, पुण्यातील भोसलेनगर परिसरात राहण्यास आहेत. ते मुळचे पुण्यातीलच आहेत. दरम्यान, त्यांना राजेश व संदेश आणि महिलेने भोर येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले.
मात्र, त्यांना कोणतीही शेतजमीन खरेदी करुन दिली नाही. त्यांनी पैसे परत मागितले असता त्यांच्या भोसलेनगर येथील राहत्या घरी येऊन त्यांना पैसे देणार नाही, असे म्हणत धमकावले. आर्थिक नुकसान करण्याची भिती घातली. ते सहायक पोलीस आयुक्त असताना मार्च २०२१ मध्ये आणखी ६ लाख रुपयांची खंडणी घेतली. पोलीस अधिकाऱ्याने निवृत्त झाल्यानंतर आता याप्रकरणी तक्रार अर्ज दिला असून त्यानुसार फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.