Pune Crime पुणे : ऑनलाइनरित्या मोबाइल खरेदी करून मागवण्यात आलेले मोबाइल ऐवजी ग्राहकांना खोक्यात साबणाच्या वड्या भरुन फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील तीन भामट्यांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
अभिषेक हरिभाऊ कंचार (वय २०, रा. श्रीगणेश छाया बिल्डींग, दिवा, ठाणे), धीरज दीपक जावळे (वय २१, रा. सिजन सहारा रिजन्सी, नांदिवली, कल्याण, जि. ठाणे), आदर्श उर्फ सनी शिवगोंविद चौबे (वय २५, रा. कस्तुरी चाळ, मानपाडा, डोंबिवली, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या भामट्यांची नावे आहेत. सेनापती बापट रस्ता परिसरात या प्रकारचा गुन्हा घडला होता. याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहिती नुसार…!
पुणे शहरातील कोंढवा परिसरातील झॅप एंटरप्रायजेस कंपनीकडून ऑनलाइन पद्धतीने खरेदी केलेले मोबाइल ग्राहकांना घरपोच देण्यात येत असतात. आरोपी कंचार, जावळे, चौबे यांनी ऑनलाइन मोबाइल फोन मागविले होते.
त्यानंतर डिलिव्हरी बाॅय मोबाइल घेऊन आरोपींकडे गेल्यानंतर आरोपी मोबाइल मध्ये त्रुटी असल्याचे भासवून मोबाईल परत करत होते.यावेळी डिलिव्हरी बाॅयला बोलण्यात गुंतवून आरोपी मोबाइलच्या खोक्यात मोबाईल न ठेवता त्यात साबणाच्या वड्या भरलेल्या होत्या.
या गुन्ह्याचा खंडणी विरोधी पथकाकडून तपास करण्यात येत होता. आरोपी कंचार, जावळे, चौबे यांनी डिलिव्हरी बाॅयची फसवणूक केल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर पथकाने तपास करुन तिघांना पकडले आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.