पुणे : लोन मंजूर करून देतो, मंत्रालयात नोकरीस लावतो असे अमिष दाखवून अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या इसमाचा ७ जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. ३०) संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना विश्व अपार्टमेंट, न-हे, पुणे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सुनिल नलावडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुदाम राधाकिसन नलावडे (वय-५७, रा. समर्पण वध्दाश्रम, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेश शंकरराव घुमाळ (वय-३२, रा. मु. पो. पिंपळे खालसा, हिवरे कुमार, पदमावती वस्ती. ता. शिरुर), शिवराज किशोरप्रसाद सिंह, वय-३२ वर्षे, रा. मोहितेवाडी, पोस्ट-वडगाव, ता. मावळ), शिवाजी रंगाप्पा तुमाले (वय-५६, रा. फ्लॅट नं. २०४, दत्तदिप सोसा, नवप्रभा पतसंस्थेमागे, गंगानगर ,फुरसुंगी, ता. हवली), अक्षय पोपट आढाव (वय-२२, रा. सिरापुर, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका इसमाला विश्व अपार्ट. न-हे, पुणे येथे कार मधून आणून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खुन केले असलेबाबत सुदाम नलावडे यांनी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात ५ ते ७ इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट ३ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करीत असताना पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळालेल्या माहितीनुसार सुनिल नलावडे याच्या ओळखीची महिला वनिता समीप कुर्डेकर (वय-४२, शिक्षीका रा. विश्व अपार्ट, दुसरा मजला, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, व तिचा पती समीप कुर्डेकर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला.
तपासा दरम्यान मयत सुनिल नलावडे याने मंत्रालय, मेट्रो विभाग येथे नोकरीस लावतो असे अमिष दाखवून व अनेक महिलांना लोन मंजूर करून देतो असे अमिष दाखवून फसवणुक केली होती. सुनिल नलावडे याने फसवणुक केलेले लोक गेल्या दिड वर्षापासून नलावडे याचा शोध घेत असल्याचे कुर्डेकर यांनी संगितले होते. शुक्रवारी (ता. ३०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुनिल नलावडे हा वनिता कुर्डेकर यांच्या घरी आल्याची माहिती फसवणुक झालेला इसम महेश धुमाळ याला मिळाली होती. त्याने त्याचे ओळखीचे असलेला शिवराज सिंह यास व इतर फसवणुक झालेल्या व्यक्तिना माहिती देवून सदर महिलेच्या घरी येण्यास सांगितले.
दरम्यान, वरील चौघांनी व इतर आणखी तिघांनी कुर्डेकर यांच्या घरात घुसून सुनिल नलावडे यास हात पाय बांधुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ओढत बिल्डिंगचे खाली पार्किंगमध्ये आणून पुन्हा त्यास बेदम मारहाण करून तो बेशुध्द झाल्याचे पाहून सर्वजण पळून गेले. त्यानुसार युनिट ३. कडील ३ वेगवेगळी पथके तयार करून तळेगाव दाभाडे, फुरसुंगी, सिरापुर, ता-पारनेर, जि.अहमदनगर येथे पाठवून वर नमुद निष्पन्न ०४ आरोपीना ताब्यात घेवून त्यांचेकडील मोबाईल व गुन्हयात वापर केलेली स्कोडा कार असा एकुण ५,०९,०००/- चा माल हस्तगत करण्यात आला. दाखल गुन्हयात आरोपींचा शोध घेवून त्यांचेकडे तपास करून १० तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कळवे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर यांनी केली आहे.