Pune Crime पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर तसेच मुख्य इमारतीमधील सभागृहात अश्लील शिव्या देत विनापरवानगी ‘रॅप’ गाण्याचे चित्रीकरण केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी शुक्रवारी चित्रीकरणात सहभागी असलेल्या तरूणांना विद्यापीठातील वसतिगृहातून ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे सहायक सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
विद्यापीठ परिसरात तसेच मुख्य इमारतीच्या सभागृहात अश्लील शिव्या देत रॅप गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. ती चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आली होती. त्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध व्यक्त केला. तसेच याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
गाण्यात अश्लील शिव्यांचा भडीमारासह तलवार, पिस्तूल घेतल्याचे दाखविले आहे. तसेच ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या सभागृहातील टेबलवर मद्याची बाटली, ग्लास ठेवून त्याचेही चित्रिकरण केले आहे. विद्यापीठाच्या या पवित्र वास्तूमध्ये याप्रकारे गाणे चित्रीकरण करण्यास परवानगी कशी दिली जाते असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, विद्यापीठाची परवानगी न घेता या रॅप गाण्याचे चित्रीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी तातडीने तपास करीत याप्रकरणात सहभागी तरूणांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, पोलिसांनी विद्यापीठातील वसतिगृहातून ताब्यात घेण्यात आले आहे तसेच इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.