पुणे : तुझ्याकडून शहरातील वेगवेगळ्या भागात अपघात झाले आहेत. त्या अपघाताची नुकसान भरपाई म्हणून ४० हजार रुपये दे असे म्हणत तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. त्यांनी शिवाजीनगर, बंडगार्डन, विश्रामबाग, वानवडी, हडपसर, मुंढवा आणि पुणे या भागातील घटना उघडकीस आल्या आहेत.
इरफान इस्माईल सय्यद (वय-३० रा. माळवाडी, हडपसर), शरद उर्फ डॅनी रावसाहेब आहिरे (वय-२६ रा. चांदे रोड, पुणे), सविता लक्ष्मण खांडेकर (रा. मांजरी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत केतनकुमार वसंतराव होवाळ (वय- ३०, रा. शोभा निवास, संतोषनगर, कात्रज, मुळ रा. कराड जि. सातारा) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होवाळ हे कामावरुन घरी जात असताना त्यांच्या पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने त्यांना आडवले. तुझ्यामुळे मागे दोन अपघात झाले आहेत. अपघाताची भरपाई म्हणून चाळीस हजार रुपये दे, नाहीतर तुझ आयुष्य उध्वस्त करेन, तु प्रॉपर पुण्याचा दिसत नाही, अशी धमकी चोरट्यांनी दिली. चोरट्यांनी फिर्यादी यांना धमकावून त्यांच्या मित्राकडून ऑनलाइन ४० हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी एटीएममधून २० हजार रुपये काढून घेतले. तर २० हजार रुपये जबरदस्तीने आरोपीच्या फोन पे अकाउंटवर जमा करुन घेतले.
या गुन्ह्यातील आरोपींचा शोध तपास घेण्यासाठी दत्तवाडी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगार असून कामठेवस्ती माळवाडी मांजरी भागात लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून वरील तीन जणांना अटक केली.
आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींच्या बँक खात्याची माहिती घेतली असता आरोपी इरफान सय्यद याच्या बँक खात्यात मागील एक वर्षात नऊ लाख रुपये वेगवेगळ्या युपीआय अकाउंटवरून जमा झाले आहेत. आरोपीच्या बँक खात्यावर ४० जणांनी पैसे जमा केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी हडपसर, शिवाजीनगर, बंडगार्डन, दत्तवाडी पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
दरम्यान, आरोपी इरफान सय्यद व शरद उर्फ डॅनी अहिरे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपी रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकाला अडवून तुमच्याकडून मागे अपघात झाल्याची सांगून जखमीच्या उपचारासाठी व गाडीच्या नुकसान भारपाईसाठी जबरदस्तीने मारहाण करुन पैसे घेत होते. तसेच सार्वजनिक बाथरुमध्ये एकट्या नागरिकास हेरुन त्याच्यासोबत अश्लील चाळे करुन व्हिडिओ रेकॉर्डिगं करत होते. तसेच पोलिसांकडे जाण्याची धमकी देऊन पैसे घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करत आहेत.