(Pune Crime )पुणे : घरगुती गॅसच्या टाकीतील इंधन व्यावसायिक गॅसच्या टाकीत अवैधरित्या भरून त्याची विक्री करणाऱ्या टोळीच्या गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाने चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वडगाव बुद्रुकमधील तुकाईनगर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.
रफिक सुलतान शेख (वय ३८), सद्दाम अजिज शेख (वय २९) आणि जमिर सुलतान शेख (वय ३६, तिघे रा. तुकाईनगर), देविसिंह रामसिंह राजपूत (वय ३६, रा. बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ११४ गॅस टाक्या, सात रिफिलिंग पाइप, रेग्युलेटर, टेम्पो असा १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई संदीप कोळगे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
तुकाईनगर येथील मंगल रिढे यांच्या खोलीमध्ये काही इसम हे एचपी’ आणि ‘भारत गॅस’ कंपनीच्या सिलेंडरमध्ये घरगुती गॅस भरून काळाबाजार करीत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता आरोपींकडे गॅस भरण्याचा कुठलाही कायदेशीर परवाना मिळून आला नाही.
दरम्यान, ‘एचपी’ आणि ‘भारत गॅस’ कंपनीच्या सिलेंडरमध्ये घरगुती गॅस टाक्यांमधून इंधन भरून विक्री करीत होते. त्या वेळी पोलिसांना ११४ गॅस सिलेंडर, रेग्युलेटर, सिलेंडर रिफिलिंगसाठी लागणारे सात पाइप आढळले. आरोपींवर सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, अश्विनी पाटील, अंमलदार राजेंद्र कुमावत, अजय राणे, मनीषा पुकाळे, इम्रान नदाफ, रेश्मा कंक, संदीप कोळगे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.