(Pune Crime) पुणे : सराफ व्यावसायिकांचे तब्बल सव्वा कोटीचे दागिने घेऊन कारागीर पसार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सिद्धेश ज्वेलर्सचे मालक कीर्ती चंदूलाल ओसवाल आणि मनोज ओसवाल यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारागीर प्रशांत सुनील सासमल (वय ४०, रा. गणेश पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी ओसवाल यांचे गुरुवार पेठेत कुबेर गोल्ड ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. तर आरोपी प्रशांत हा सोन्याची दागिने घडून देणारा कारागीर आहे. गुरुवार पेठेतील अनेक सराफांचे तो दागिने भरून देण्याची काम करतो. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांचा त्याच्यावर विश्वास होता.
दरम्यान, फिर्यादी कीर्ती ओसवाल यांनी आरोपी प्रशांत यांच्याकडे १ कोटी ७ लाख ५३ हजारांचे सोन्याचे दागिने घडविण्यासाठी दिले होते. तर मनोज ओसवाल यांनीही आरोपी प्रशांत यांच्याकडे १८ लाख ५४ हजारांचे सोन्याचे दागिने घडविण्यासाठी दिले होते. एक ते दीड महिन्यांपूर्वी त्यांनी सराफी व्यावसायिकांकडून सोने घेतले. दागिने घेतल्यानंतर आरोपी प्रशांत हा फरार झाला आहे.