(Pune Crime) पुणे : भिकाऱ्या बापाने चक्क आपल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्यापेक्षा तिप्पट वय व दोन मुले असलेल्या बापाशी ठरविल्याची धक्कादायक घटना आळंदी परिसरातील एका मंगल कार्यालयात काल गुरुवारी (ता.२३) दुपारच्या सुमारस उघडकीस आली आहे. बोहल्यावर चढून मुलीचा बालविवाह होणार होता. तेवढ्यात पोलीस आणि बालकल्याण समितीने बालविवाह रोखला आहे. आणि मुलीला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार…!
वानवडी परिसरात राहणारी दिव्या (नाव बदललेले आहे) ही १४ वर्षांची आहे. ती लहान असतानाच तिची आई जग सोडून गेली होती. त्यातच बापाला फिट्सचा त्रास; त्यामुळे तो तेव्हापासून काम करीत नव्हता. दिवसभर भीक मागून आणायचा ते खाऊनच त्याने या मुलीला वाढवलं आणि स्वत:ही जगला. स्वत:च्या आजारपणामुळे त्याला मेहनतीचे काम जमत नसल्याने त्याचे दुसरे लग्नही झाले नाही; त्यामुळे या मुलीची जबाबदारी त्याच्यावर आली. मात्र भिकेतूनही पोट भरत नसल्याने त्याने अखेर या मुलीचे लग्न लावून देण्याचे ठरवले.
अशी परिस्थिती असणाऱ्या मुलीशी लग्न तरी कोण करणार? त्यामुळे चांगल्या मुलाचे स्थळ तिला येईना. तर दुसरीकडे मुलगी तरुण होत चालली असल्याने तिच्या सुरक्षेचा प्रश्नही त्या बापाला सतावायला लागला. त्यामुळे अखेर त्याला तिच्यापेक्षा वयाने तिप्पट असलेला घटस्फोटित पुरुष सापडला. कहर म्हणजे त्याला याधीच तब्बल दोन मुले आहेत. तरीही लग्न ठरले, मुहूर्त निघाला आणि गुरुवारी दुपारी विवाह होणार होता.
दरम्यान, दिव्याचा बालविवाह होणार असल्याची माहिती बालन्याय मंडळ समितीच्या माजी सदस्या मनीषा पगडे आणि लक्ष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पुंडे, कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर व सदस्य आनंद शिंदे, ॲड. पूर्वी जाधव, वैशाली गायकवाड व शामलता राव यांना सांगितली.
त्यानंतर बालकल्याण समितीने याबाबत वानवडी पोलिस ठाण्याला सूचना देऊन घटनेची खातरजमा केली. मुलीचा जन्मदाखला तपासला, त्यावरून ती चौदा वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस व बालकल्याण समितीचे अधिकारी तातडीने आळंदीत पोहोचले. आणि दिव्या बोहल्यावर चढणार तेवढ्यात बालविवाह रोखला. व मुलीची सुरक्षित ठिकाणी रवानगी केली.