Pune Crime : पुण्यातील कोथरूड परिसरात मैत्रीच्या नात्यावरून झालेल्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागेश संजय जाधव (वय 23, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) या तरुणाला त्याच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी इमारतीच्या टेरेसवर नेऊन बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नागेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणामुळे पुणे शहरात संतापाची लाट पसरली असून समाजात अजूनही वैयक्तिक नातेसंबंधांवरून हिंसक प्रतिक्रिया दिल्या जात असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश आणि कोथरूडमधील मेगासिटी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीमध्ये काही काळापासून मैत्री होती. दोघे फोनवर बोलत असत आणि अधूनमधून भेटतही होते. मात्र मुलीच्या कुटुंबीयांना ही मैत्री मान्य नव्हती. याच पार्श्वभूमीवर 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी नागेश मैत्रिणीला भेटण्यासाठी त्या परिसरात गेला. तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला इमारतीच्या टेरेसवर नेले आणि लाकडी दांडक्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाण इतकी गंभीर होती की नागेश गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळला. त्यानंतर आरोपींनी नागेशच्या कुटुंबीयांना फोन करून “तुमचा मुलगा इथे पडला आहे, 10 मिनिटांत येऊन घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ,” अशी धमकी दिल्याचे सांगितले जाते. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र ससून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर नागेशची आई सुरेखा जाधव यांच्या तक्रारीवरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये 5 महिला आणि 1 पुरुष यांचा समावेश आहे. उर्वरित 4 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही घटना केवळ एक गुन्हा नसून समाजातील बदलत्या नातेसंबंधांबद्दलची असहिष्णुता आणि हिंसक मानसिकता दर्शवते. तरुण-तरुणींमधील मैत्री किंवा संबंधांना कुटुंबीयांचा विरोध असू शकतो, परंतु त्यावर उपाय म्हणून हिंसा वापरणे ही अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे. अशा घटनांमुळे कायद्याबद्दलचा धाक कमी होत असल्याची चिंताही व्यक्त केली जात आहे.







