Pune Crime पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात भल्या सकाळी ज्येष्ठ नागरिकाचा डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ज्येष्ठ नागरिकाचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. हा प्रकार कोंढव्यातील पिसोळी परिसरात घडला. या खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. खुनाच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हाजीमुद्दीन बोराटे (वय ६२, रा. पिसोळी) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
पिसोळीत बारोट हे मुलगा व कुटूंबासोबत भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांचा कोणाशी वाद किंवा वैर नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर आंबेकर हॉटेलजवळ एका ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरातील रहिवाशांकडे चौकशी केली. मात्र, रहिवाशांकडून ठोस माहिती मिळाली नाही. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. दरम्यान त्यांचा खून नेमका कोणत्या कारणांनी झाला हे समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.