पुणे : खुनाचा प्रयत्न आणि घातक शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे करुन कोंढवा व समर्थ पोलीस ठाण्याच्या परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार अमन युसुफ पठाण उर्फ खान (वय-22 रा. अशोक चौक, नाना पेठ, पुणे) याच्यावर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी केलेली ही 85 वी कारवाई आहे.
आरोपी अमन पठाण हा समर्थ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने आपल्या साथीदारांसह कोंढवा, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्टल, लोखंडी कोयता आणि तलवार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केलेले आहेत. गेल्या दोन वर्षात त्याच्यावर 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी अमन पठाण याला एमपीडीए कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर व गुन्हे शाखा, पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.