पुणे : गाई, म्हशींच्या दूधवाढीसाठी ऑक्सिटोसीन या ओैषधाची निर्मिती करून त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन विक्री करणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीला पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक, विमानतळ पोलीस ठाणे तसेच अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) ताब्यात घेतले आहे.
समीर अन्वर कुरेशी (वय २९, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजीत सुधांशु जाना (वय ४४, रा. पुरबा बार, विलासपुर, पुरबा मदीनीनपुर, पश्चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (वय २७, तिराईपूर, पश्चिम बंगाल), सत्यजीत महेशचंद्र मोन्डल (वय २२, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (वय ३२, रा. नलपुरकुर, मंडाल, २४ परगाना, पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून ऑक्सिटोसीन ओैषधांचा ५३ लाख ५२ हजारांचा साठा जप्त केला आहे. तर आरोपींनी पुणे शहर, जिल्हा तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागातील गोठे मालकांना ऑक्सीटोसीन ओैषधाची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी सुहास सावंत यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील कलवड वस्ती येथे गाई, म्हशी यांचे दूध वाढीसाठी (पाणवणे) वापरल्या जाणाऱ्या औषधांचा बेकायदा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी पांडुरंग पवार मिळाली होती. पवार यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एफडीए अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. पोलीस तसेच एफडीएच्या पथकाने तेथे छापा टाकला. पत्र्याच्या एका शेडमध्ये ऑक्सिटोसीन ओैषधांचा साठा खोक्यांमध्ये भरून ठेवल्याचे उघडकीस आले. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, मनोज साळुंके आदींनी ही कारवाई केली.
गोठे मालकांना ओैषधाची विक्री..!
आरोपी समीर कुरेशीने साथीदारांशी संगनमत करुन ऑक्सीटोसीन ओैषधांचा साठा करुन ठेवल्याचे तपासात उघडकीस आले. ऑक्सीटोसीन ओैषध इंजेक्शनमध्ये भरून ते गाई, म्हशींना देण्यात येत असल्याची माहिती आराेपींनी दिली. आरोपींनी पुणे शहर, जिल्हा तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागातील गोठे मालकांना ऑक्सीटोसीन ओैषधाची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस उपायुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे तसेच एफडीचे सहायक आयुक्त दिनेश खिंवसर, आतिष सरकाळे, सुहास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मानवी शरीरावर परिणाम..!
ऑक्सीटोसीन औषधाचा वापर गाई, म्हशींच्या दूध वाढीसाठी केला जातो. गाई, म्हशींना ऑक्सीटोसीन ओैषध दिल्यानंतर दूध जास्त प्रमाणात येते. मात्र, त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतो. ते दूध प्यायल्यास अशक्तपणा, दृष्टीविकार, पोटाचे आजार, नवजात बालकांना कावीळ, गर्भवती महिलेस रक्तस्त्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे विकार तसेच त्वचेचे विकार असे गंभीर विकार होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.
प्रसुती सुरळीत पार पाडण्यासाठी वापर..!
ऑक्सीटोसीन ओैषध हार्मोन आहे. त्याचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रसुती सुरळीत पार पाडण्यासाठी केला जातो, असे एफडीएतील अधिकारी ओैषध निरीक्षक सुहास सावंत यांनी सांगितले. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात संगमनत करुन फसवणूक, प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देणे; तसेच विविध कलामांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.