Pune Bribe पुणे : उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या पुण्यातील विद्युत निरीक्षण कार्यालयातील वरिष्ठ लिपीकासह चालकावर १२ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Bribe)
सचिन विष्णु गाजरे (वय ३०, वरिष्ठ लिपीक वर्ग-३) व बाळु काशिनाथ विडकर (वय ५७, चालक अति. कार्यभार आयक जावक लिपीक) असे विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २९ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी विद्युत ठेकेदारीचा परवाना मिळण्यासाठी विद्युत निरीक्षण कार्यालयात (उद्योग उर्जा व कामगार विभाग, सदाशिव पेठ, पुणे) आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन अर्ज केला होता.
सदरच्या विद्युत ठेकेदारीच्या परवाण्याच्या चौकशीसाठी तक्रारदार सदर कार्यालयात गेले असता, विद्युत ठेकेदारीचा परवाना देणेसाठी कार्यालयातील आरोपी लोकसेवक सचिन गाजरे यांनी लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक सचिन गाजरे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच आरोपी लोकसेवक बाळु विडकर यांनी तक्रारदार यांची फाईल आवक जावक टेबलवरुन पुढे पाठविण्यासाठी २ रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर दोन्ही आरोपींवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण करीत आहेत.