Pune bribery case पुणे : पुणे महानगरपालिकेतील मीटर रीडर २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ११) रंगेहाथ पकडले आहे. (Pune bribery case)
उमेश राजाराम कवठेकर (वय-५४, नोकरी, मीटर रीडर, चतु:श्रृंगी पाणी पुरवठा विभाग, पुणे महानगरपालिका) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मीटर रीडचे नाव आहे. याप्रकरणी एका ३१ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे परवानाधारक प्लंबर आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाला शिवाजीनगर, भांबुर्डा येथील मिळकतीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यायचे होते. त्यासाठी तक्रारदार यांनी कर्वे रस्त्यावरील चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात अर्ज केला होता. तेव्हा आरोपी कवठेकर याने ना-हरकत प्रमाणपत्रासाठी २५ हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीत केली असता, आरोपी कवठेकर याने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये व स्वत:साठी पाच हजार रुपये असे एकूण २५ हजारांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ११) चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात सापळा रचून कवठेकर याला लाच घेताना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत.