Pune Bribe पुणे : राज्यातील सर्वच शासकीय खात्यांना भ्रष्टाचाराच्या कीडीने पोखरले आहे. नागरिकांचे कोणतेही काम लाच घेतल्याशिवाय अधिकारी करत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. (Pune Bribe) नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीमधून लाचखोरीत महसूल विभाग पहिल्या तर पोलीस विभाग द्वितीय स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या सहा महिन्यांत ४३४ सापळे रचले. यामध्ये ६०५ शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक केल्याची, धक्कादायक आकडेवारी एसीबीच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. (Pune Bribe)
लाचखोरी मिटवण्यासाठी प्रत्येक समाजघटकाने पुढे या, कामासाठी लाच मागणाऱ्याविरुद्ध तक्रार करा’, असे कितीही फलक शासकीय कार्यालयांमध्ये लावले असले तरीही. शासकिय कर्मचारी लाच घेतल्याशिवाय काम करतच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. काही अधिकारी, कर्मचारी प्रामाणिक आहेत देखील. पण लाचखोरांचा भरणा अधिक असल्याने सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या वारंवार पायऱ्या झिजवाव्या लागतात. राज्यात लाचखोरी प्रत्येक शासकीय विभागात वाढली असून, महसूल विभाग पहिल्या तर पोलीस विभाग द्वितीय क्रमांकावर कायम आहे. महसूल विभागात सर्वाधिक तलाठी तर पोलीस विभागात सर्वाधिक पोलीस हवालदारांचा लाचखोरांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, लाचखोरी संपवण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली आहे. गेल्या सहा महिन्यांत महसूल विभागात १०४ लाचखोरीचे सापळे रचले गेले असून, त्यात १४२ लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ८७ वर्ग तीनच्या कर्मऱ्यांचा समावेश आहे. पोलीस विभागावर ७९ सापळे रचले गेले असून १०९ लाचखोर पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यात ८४ पोलीस हवालदारांचा समावेश आहे. पंचायत समिती तिसऱ्या स्थानावर आहे. ४५ सापळे रचण्यात आले असून, ५९ लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लाचखोरीत महापालिका, वीज महामंडळ आणि शिक्षण विभागाचा क्रमांक लागतो.
लाचखोरीचे सर्वाधिक गुन्हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. ९१ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सापळे रचण्यात आले. द्वितीय स्थानावर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर असून, प्रत्येक ७४ लाचखोरीचे गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या स्थानावर ठाणे (५४) असून, नागपूरचा (४३) सातवा क्रमांक लागतो. नागपूर परीक्षेत्रात अनेक तक्रारदारांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सापळा कारवाईमध्ये राज्यात शेवटच्या क्रमांकावर असल्याचे समोर आले.
लाचखोरीची आकडेवारी
(महिना-सापळा-आरोपी)
जानेवारी – ५९ -४६
फेब्रुवारी – ७५ – १११
मार्च – ८८ – १२४
एप्रिल – ७० – १००
मे – ६९ – १००
जून – ७३ – ९०