पुणे : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामधून बोलत असल्याचं सांगत पिंपरी परिसरात चिखली या ठिकाणी असलेल्या मेट्रोच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ आणि दमबाजी करत संबंधिताकडे पैशांची मागणी करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवदास साधू चिलवंत (वय-४१, रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या सुरक्षेसाठी पिंपरी परिसरात चिखली या ठिकाणी खासगी एजन्सीमध्ये शिवदास चिलवंत हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. यावेळी त्यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचं सांगणारा फोन आला. मी धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत आहे. तू मूळचा उस्मानाबाद येथील राहणारा आहेस. त्यामुळे शिवाजीनगर येथे धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे, असे म्हणत फोनवरुन त्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करण्यात आली.
या घटनेने चिखली परिसरात एकच खळबळ उडाली होती. हा फोन नक्की कुठून आला आणि तो खरा आहे की नाही याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेबाबत धनंजय मुंडे यांच्या ऑफिसकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तपास चिखली पोलीस करीत आहेत.