Pune पुणे : दारुचे बिल जास्त झाल्याची विचारणा केली म्हणून वाईन्स शॉपमधील कर्मचाऱ्याने चक्क ग्राहकाच्या डोक्यात दारुची बाटली फोडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावरील एफ केज वाईन्स शॉपमध्ये सोमवारी (ता.२४) रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या आहेत.
शुभम भिमराव वानखेडे (वय २३, रा. शांतीनगर, येरवडा ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी शफी सलीम खान (वय ३९, रा. प्रायवेट रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी खान व त्यांचा मित्र साजिद पटेल हे एफ केज वाईन्स येथे दारु खरेदी करण्याकरीता गेले होते. तेव्हा दारू खरेदी केल्यानंतर शॉपमध्ये सर्व्हिस देणार्या शुभम वानखेडेकडे त्यांनी बिल जास्त का झाले. याबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपीने उलट सुलट उत्तरे दिली.
दरम्यान, आरोपी वानखेडे याने उलट सुलट उत्तरे दिल्याचा राग आल्याने फिर्यादी खान याने वानखेडेच्या थोबाडीत मारली. तेव्हा वानखेडेने फिर्यादीच्या डोक्यात दारुने भरलेली काचेची बाटली मारुन जखमी केले.
याप्रकरणी शफी खान यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शुभम वानखेडे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.