योगेश मारणे
न्हावरे ता. 28 : स्वारगेट बस अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी दत्तात्रय गाडे हा शुक्रवारी पहाटे शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पोलिसांच्या ताब्यात आला. सध्या या प्रकरणात गुणाट ग्रामस्थांचे कौतुक होत असून आरोपीला प्रत्यक्ष पकडणारे प्रा. गणेश गव्हाणे हे राज्यभर कौतुकाचा विषय ठरले आहेत. त्यांनीच हा थरार ‘पुणे प्राईम न्यूज’ ला सांगितला.
‘‘संपूर्ण राज्यभर गाजत असलेले स्वारगेट बस बलात्कार प्रकरण हे गुणाट (ता.शिरूर) गावाला लागलेला काळा डाग होता. तो डाग मिटवण्याचे काम करून आरोपीला पकडून देण्याचे काम केल्यामुळे मनाला समाधान मिळाले आहे’’. असे प्राध्यापक गणेश बापू गव्हाणे यांनी ‘पुणे प्राईम’शी बोलताना सांगितले.

सुमारे ५० तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या पोलिसांच्या शोध मोहिमेत प्रा.गणेश गव्हाणे यांनी गावातील मित्रांसोबत सहभाग घेतला होता. प्रा.गव्हाणे यांना आज (दि.28) पहाटे गुणाट परिसरातील चंदनवस्ती येथे येथील कॅनॉलच्या बाजूला काहीतरी हालचाल झाल्याचे गाडीच्या लाईटच्या उजेडात दिसले. त्यावेळी हातामध्ये कीटकनाशकाची बाटली घेऊन संशयित आरोपी दत्तात्रय गाडे हा लपून बसला होता.

प्रा.गव्हाणे यांनी खात्रीसाठी दुचाकी गाडी आरोपीच्या जवळ नेऊन गाडीच्या लाईटमध्ये पाहणी केली तर तो दत्तात्रय गाडे हाच होता. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, दत्तात्रय गाडे याला पकडला आणि पोलीस पाटील हनुमंत सोनावणे यांना फोन करून सर्व माहिती सांगितली. त्यानंतर पोलीस पाटील व पोलिसांनी येऊन आरोपीला ताब्यात घेतले. परिणामी प्रा.गणेश गव्हाणे यांच्या प्रसंगावधानाने गाडे हा स्वतःच्या जीवाचे बरे-वाईट करण्याअगोदरच आरोपी पकडला गेला. मात्र प्रा.गणेश गव्हाणे यांनी साईनाथ वळू, मनोज गव्हाणे, रामदास आखुटे, श्याम वळू, अरविंद घोडके या सहकारी मित्रांना गाडेला पकडण्याचे श्रेय दिले आहे.
पकडल्यावर काय म्हणाला गाडे?
‘‘जे झाले ते माझ्या मनाला माहिती आहे. मी सर्व काही पोलीस स्टेशनला गेल्यावर पाहील, मला माझ्या मुलाला भेटायचे आहे, नाहीतर माझ्या घरी एक फोन लावून द्या’’, असे संशयित दत्तात्रय गाडे पकडल्यावर म्हणाल्याचेही प्रा.गणेश गव्हाणे यांनी सांगितले. तसेच दत्तात्रय गाडे याला कुठलाही पश्चाताप झाल्याचे दिसत नव्हते, असेही प्रा. गव्हाणे यांनी सांगितले.
दरम्यान पत्रकार परिषदेत पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुणाट गावातील लोकांचे कौतुक केले आहे. शोध मोहिमेत गुणाटवासियांचा मोठा हातभार असल्याचे त्यांनी सांगितले. गावात जावून त्यांचे सत्कार करणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.