पुणे : राज्यातील विविध कारागृहात असलेल्या ५० वयापेक्षा जास्त बंदीवानांना स्वखर्चाने अंथरुण आणि उशी घेण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विविध ऋतूमध्ये बंदीवानांना होणार्या त्रासापासून सुटका होणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी १५ फेब्रुवारीला कारागृह अधीक्षक यांच्यासोबत अडी-अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर ५० वयापेक्षा असलेल्या बंदीवानांना स्वखर्चाने जाड बेडींग (अंथरून) आणि उशीचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता कैद्यांना सुखाची झोप मिळणार आहे. तसेच वयोवृद्ध बंदीवानांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून बहुतांश कारागृह प्रशासनाने ठोस अंमलबजावणी करावी. संबंधित बंदीवानांना त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचेही सूचित देखील करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील विविध कारागृहातील बंदीवानांसाठी मागील काही महिन्यांपासून प्रशासनाकडून विविध नाविण्यपुर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे बंदीवानांमध्येही समाधानाचे वातावरण असून संबंधितांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.