Crime News : हरियाणा : हरियाणाजवळील जिंद येथील एका सरकारी शाळेतील नराधम मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल १४२ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या १४२ मुलींनी मुख्याध्यापकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला असून, शाळेतील इतर मुलींनी या भीषण कृत्याचे साक्षीदार असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी आरोपी मुख्याध्यापकाची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना जिंद जिल्ह्याचे उपायुक्त मोहम्मद इम्रान रझा म्हणाले की, नराधम मुख्याध्यापकाचे प्रताप उघडकीस आल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने एकूण ३९० मुलींचे जबाब नोंदवले. मुलींवरील लैंगिक अत्याचाराबाबत पुढील कारवाईसाठी शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे १४२ घटनांच्या तक्रारी पाठवल्या आहेत. या मुलींनी मुख्याध्यापकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला तर इतरांनी या भीषण कृत्याचे आपण साक्षीदार असल्याचे सांगितले. या आरोपानंतर आरोपी मुख्याध्यापकाची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध पेटून उठले पाहिजे, अन्याय सहन करणे हा देखील गुन्हा आहे, हे मुलींना सांगितल्यानंतर मुली बोलत्या झाल्या. यापैकी सुमारे १५ मुलींनी यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग आणि इतरांना या भयंकर कृत्याबाबत पत्रे लिहिली होती.
दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी हरियाणा महिला आयोगाने या पत्राची दखल घेतली आणि दुसऱ्या दिवशी १४ सप्टेंबर रोजी ते जिंद पोलिसांकडे कारवाईसाठी पाठवले. पोलिसांनी या प्रकरणात ३० ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल केला. आरोपीला ४ नोव्हेंबर रोजी अटक करून ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, आरोपी मुख्याध्यापकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.