लोणी काळभोर (पुणे)– भाडे तत्वावर राहत असलेल्या फ्लॅटमध्ये एका तरुणाला प्रवेश न दिल्याच्या कारणावरुन लोणी काळभोर येथील एका नामांकित महाविद्यालयीन तरुणीला हटकल्याने, लोणी काळभोर येथील एका नामांकित गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षासह तिघांना वीस तासाहुनही अधिक काळ पोलिस कोठडीची हवा खावी लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १७) घडली आहे.
लोणी काळभोर येथील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या २१ वर्षीय मावस भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी व्यंकटेश जॉयनेस्ट गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह तिघांच्याविरोधात तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी रात्री गुन्हा (गु. रजि. नं. ४९५/२२) केला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी वरील तिघांना अटकही केली होती.
पोलिस सुत्रांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार, वरील प्रकरणातील १९ वर्षीय तरुणी लोणी काळभोर येथील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असुन, जॉयनेस्ट या गृहनिर्माण संस्थेत भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये एकटीच राहते. शनिवारी सांयकाळी ती तरुणी राहत असलेल्या जॉयनेस्ट या गृहनिर्माण संस्थेच्या विंगमधुन ती तरुणी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये तरुण आले असुन, गोंधळ घालत असल्याची तक्रार संस्थेच्या एका सदस्याने अध्यक्षांच्याकडे केली.
या तक्रारीची खातरजमा करण्याच्या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष व आनखी दोघेजण ती तरुणी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये गेले असता, तरुणी व संस्थेच्या अध्यक्ष यांच्याच वादविवाद झाला होता. यातुन वरील तक्रार दाखल झाली होती. संस्थेच्या अध्यक्षांनी घरात शिरुन, तुम्ही येथे अश्लिल धंदे करता आम्हाला माहिती आहे , उद्या मिटिंग घेऊन तुम्हा दोघींना इथून काढून टाकले नाही तर बघा, अशी धमकी देत मुलीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील हाव भाव केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, तरुणीच्या २१ वर्षीय मावस भावाने केलेले सर्व आरोप जॉयनेस्ट या गृहनिर्माण संस्थेने फेटाळले आहेत.