इंदापूर, (पुणे) : इंदापूर तालुक्यातील पळसदेव, माळेवाडी परिसरातील मक्याच्या पिकात अफूची शेती करणाऱ्या सहा शेतकऱ्यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तब्बल ७ हजार ८७ किलो वजनाची १ कोटी ४१ लाख ७४ हजार रुपये किमतीची अफूची बोंडे जप्त केली आहेत.
काशीनाथ रामभाऊ बनसुडे, दत्तात्रय मारूती बनसुडे, राजाराम दगडु शेलार, लक्ष्मण सदाशिव बनसुडे, माधव मोतीराम बनसुडे, रामदास जगन्नाथ शिंदे (सर्व रा. माळेवाडी, पळसदेव ता. इंदापुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा शेतकऱ्यांची नावे आहेत.
याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अन्वये सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळसदेव गावांतर्गत असलेल्या माळेवाडी, शेलारपट्टा परिसरातील काही शेतकऱ्यांनी अफूची लागवड केल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने इंदापूर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांना मका पिकामध्ये काही प्रमाणात अफूची लागवड केल्याचे आढळून आले. सध्या पिकाचा बहर सुरु झाला असून, फुलांचे रूपांतर अफूच्या बोंडामध्ये झाल्याचे आढळून आले. येथील शेतकऱ्यांचा प्रताप पाहून पोलीसही अचंबित झाले होते.
या अफूची पूर्ण वाढ झाली असून, त्याची बोंडेदेखील वर आली आहेत. मात्र, तरीही ही अफूची शेती कोणाच्याच नजरेस पडली नाही. पोलिसांना गुरुवारी (ता. ०२) दुपारी या शेतीचा सुगावा लागला आणि तब्बल दीड एकरातील ही अफूची शेती आढळून आली आणि इंदापूरसह परिसरात एकच खळबळ उडाली.
सध्या पिकाचा बहर सुरु झाला असून, फुलांचे रूपांतर अफूच्या बोंडामध्ये झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर अफू मजुरांच्या साह्याने काढणी केली. अफूची बोंडे पिशवीत भरण्यात आली आहेत. ७ हजार ८७ किलो वजनाची १ कोटी ४१ लाख ७४ हजार रुपये किमतीची अफूची बोंडे पोलिसांनी जप्त केली असून सहा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने करीत आहेत.
दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे , उत्पादन शुल्क निरीक्षक पोळ, तालुका कृषी अधिकारी यांनी घटनस्थळाला भेट दिली.