अजित जगताप
सातारा : सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपचे वजनदार नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय युती करून महाराष्ट्राचे समीकरण बदलले. तिसऱ्या महाविकास आघाडीला रोखून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद आपल्या ताब्यात ठेवून कामाचा धडाका सुरू केला.
परंतु, इतर सहकाऱ्यांना सत्तेचा वाटा देताना विलंब होत आहे. आता हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाचे विस्तारानंतर नाराज आमदार व कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा बंडाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष नागपूरकडे आहे.
काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित असलेले एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे आलेले शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर पक्ष्यातर्गत अन्याय झाला म्हणून त्यांनी आसाम राज्यात जाऊन गुवाहाटी येथे बंड जाहिर केले होते. आता ते राज्याचे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्यामुळे खूप मोठ्या अशा आकांक्षा वाढलेले आहेत.
शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला नमोहरम करीत त्यांनी सत्तेची चावी स्वतःकडे ठेवली. धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये प्रथमदर्शनी भाजपचाच वर्चस्व दिसून आल्यामुळे शिवसेनेची ही दुसरी ‘पैकर्स’ टीम सध्या बॅकफूटवर आलेले आहे. महाराष्ट्रात भाजपकडे दमदार ३० नेते आहेत.
त्यामध्ये भाजपच्या वाट्याला वीस मंत्री तर शिंदे गटाच्या वाटायला आठ मंत्री पद आलेले आहे. एकट्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बारा खाती आहेत.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक नेमल्यामुळे स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत पातळीवरही प्रशासकांच्या हाती कारभार आल्याने कार्यकर्त्यांना किंमत राहिलेली नाही.
बाजार समिती पासून ते खरेदी विक्री संघ अशा छोट्या-मोठ्या संस्थांमध्ये संधी मिळेल म्हणून पक्षाकडे चिटकून असलेल्या कार्यकर्त्यांच्या कोंडमारा होत आहे. वरिष्ठ पातळीवरील नेते स्थानिक पातळीवरील छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यांची कामे होत नाहीत. हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात पाहण्यास मिळत आहे.
पूर्वी युगपुरुष हे आदर्श होते. आता काही अर्धवटराव सिंहाची कातडी पांघरून लबाड लांडग्यांची कृती करीत आहेत. त्यांचा निषेध करण्यापेक्षा ”आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्टं” अशा पद्धतीने राजकीय प्रवास सुरू झालेले आहे. दुसरीकडे शिवशक्ती – भीमशक्तीचा नारा पूर्वी रिपाई नेते रामदास आठवले देत होते. आता त्यामध्ये ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे नाव पुढे आलेले आहे.
ही परिवर्तनाची नांदी असली तरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर यापूर्वी व्यक्त केलेल्या मताची आता खिल्ली उडवण्यात येत आहे. कार्यकर्त्यांचा कोंडमारा सुरू झाल्या असताना युती- आघाडी सोबत का? याचं गणित सुटत नसल्याने काही कार्यकर्त्यांना आता राजकीय वनवासात जावे लागले आहे. तर ते सुध्दा बंडाच्या पवित्र्यात आहेत. अशी गोपनीय माहिती हाती आली आहे.
या चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विस्तार होत आहे. आपलं स्थान पक्क झालेले आहे, अशा भ्रमात काही आमदार आहेत. त्यामुळे अशा आमदारांना मंत्रिपद मिळेल अशा कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे चलो नागपूर,,, हा नारा दिला जात आहे.
अफजलखानाच्या कबरीच्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटला आहे. सर्वत्र एकनाथ शिंदे यांचा गौरव सुरू झाला आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल काहींनी अकलेचे तारे तोडले. त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धोरण स्वीकारले जात नाही, असा थेट आरोप शिवप्रेमी करू लागलेले आहेत.
याबाबत सन्माननीय एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या समर्थकांनीही आपली भूमिका स्पष्ट करणे महत्त्वाचे ठरत आहे.
सध्या हिवाळी अधिवेशनानंतर वजनदार आमदारांना जर मंत्रीपद मिळाले नाही तर महाराष्ट्रात नक्कीच तिसरे बंड पाहण्यास मिळेल अशी चर्चा रंगू लागलेली आहे. त्यामुळे आता राजकारणाची बाजू दोन मातब्बर नेते कशी पार पाडतात?हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.