पुणे : कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या तरुणाचं मृत्यू झाला आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांची दिरंगाई आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त झाला. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याच्या संदर्भाने हालचाली सुरु केल्या.
दरम्यान, या अपघाताच्या वेळी मी नाही, तर आमचा चालक गाडी चालवत होता, असा दावा पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपी आणि गाडीतील त्यांच्या दोन मित्रांनी जबाबात केल्याची माहिती आहे. आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांनीही अपघाताच्या वेळी आमचा फॅमिली ड्रायव्हर पोर्शे कार चालवत होता, असा दावा केल्याची माहिती समोर आली होती.
काय म्हणाले आयुक्त अमितेश कुमार?
याबाबत आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. आयुक्त म्हणाले की, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कलमी ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास कलम ३०४ कलम जोडण्यात आले. पुढे बाल हक्क न्याय मंडळापुढे तो सज्ञान म्हणून गृहीत धरण्याची मागणी केली.
सज्ञान करण्याबाबत एक प्रक्रिया असते, त्याला वेळ लागतो. तोपर्यंत आम्ही आतमध्ये पब मालक आणि मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला. ३०४ हा गुन्हा नोंद झाल्याने मुलाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. आरोपीला सज्ञान मानावे याबाबतची प्रक्रिया झाली असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
आरोपी मुलगाच गाडी चालवत होता : अमितेश कुमार
पुढे बोलताना म्हणाले, या प्रकरणातील इतर आरोपींना देखील अटक केले आहे. या प्रकरणात पुरावे नष्ट केले आहेत का? याचा तपास सुरु आहे. तसेच ब्लड रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नसून ब्लड रिपोर्ट दोनदा घेण्यात आला आहे. दोन्हीचे डीएनए एकच आहे का? याचा शोध घेतला जात आहे. पोर्श कार आरोपी मुलगा चालवत होता. यासाठीचे तांत्रिक पुरावे एकत्र केले आहेत. पुराव्याच्या आधारावर आरोपी मुलगाच गाडी चालवत होता त्याला होणाऱ्या कृत्याची कल्पना होती, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले.