फिजा शेख
दौंड : डीजेवर मोठ्या आवाजात गाणी लावून हुल्लडबाजी केल्याचा प्रकार दौंड शहरात रविवारी (ता.२) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. तर हुल्लडबाजी थांबवून डीजे बंद करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक फौजदारालाच दोघांनी धक्काबुक्की केल्याने याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद अण्णाराव जाधव व अनोक शाम जाधव (दोघे रा. गोवा गल्ली, दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर याप्रकरणी सहायक फौजदार सुरेश दत्तात्रेय चौधरी यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड – सिध्दटेक अष्टविनायक मार्गावर छत्रपती संभाजी स्तंभासमोर रविवारी (ता.२) मध्यरात्री २ वाजता डीजे वर कर्कश आवाजात गाणी लावून हुल्लडबाजी करून काही जण नाचत असल्याची माहिती आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गस्त घालणारे पथक घटनास्थळी दाखल झाले.
सदर ठिकाणी डीजेवर मोठ्या आवाजात गाणी लावून हुल्लडबाजी सुरु होती. तेव्हा पोलिस पथकाने डीजे बंद करण्यास सांगितले असता आरोपी आनंद जाधव व अनोक जाधव यांनी पथकासमवेत हुज्जत घातली. डीजेचा आवाज बंद करण्यास नकार देत त्यांनी गोंधळ घातला. डीजे बंद करण्याऐवजी आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करीत मोठमोठ्याने आरडाओरडा केला.
याप्रकरणी सहायक फौजदार सुरेश चौधरी यांनी दोघांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हल्ला किंवा बळाचा वापर करणे, लोकसेवकांना कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचविणे व समान उद्देश्य साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली गुन्हेगारी कृतीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून यातील आनंद जाधव याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात यापूर्वी दोन फौजदारी गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.